झपा झपा पावलं टाकत चाललेलो. पाय टाकलं तसा फुफूटा उटायचा. वैजू ननावरेच्या घराच्या मागचं चमकी काटं तिसरा पारच्या उन्हात चमकत व्हतं. नेहमी भन्नाट दिसणारं बराड़ं आज माणसांच्या वर्दळीनं गजबजलं व्हतं. वरगळं उतरताना मला बामणाच्या पावातली माणसं दारात काड़लेल्या पांढर्या रांगोळीच्या गोल कड़्यासारखी दिसतं व्हती. सुर्यानं बी तोंड टाकलं व्हतं. दिसं उतारला व्हंता. समोरनं सायकलवरनं शर्टाचा किसा लाल भडक झालेला पैश्याच्या चिल्लरनं भरलेला माणूस गप्प चालेला. पण म्याच म्हणलं "काय वं पावणं, संपलं काय "गारेगार.
तसं नुसतं ड़ोक्याला टापर बांधलेलं त्वांड़ हालवून भर्रकन निगून गेला.