सूर्य आग ओकत होता. लांबवर उन्हाच्या झळया डोळ्याचं पातं लवलं तशा खाली-वर होत होत्या. डांबरी सडक उन्हामुळे जाम तापलेली चुलीवरच्या तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यावर तव्यानं जसं चर्ररर कराव. तसा तिने राग धरला होता.लांबवर चिटपाखरूही दिसत नव्हतं. पांढऱ्या रंगाच्या पंचानं मी माझं तोंड बांधलेलं व्हतं.पण पायाला गरम वाफा लागत होत्या. साठच्या वेगानं चालू असलेली माझी हिरो होंडा गाडीला मी ब्रेक दाबला.लांबणीच्या प्रवासानं डोळ्यातलं पाणी गालावर पसरलेलं. घशाला कोरड पडलेली.
गाडीचा हॅन्डल सोडून पाठीच्या मणक्याला मी ताण दिला.पुरा बेहाल झालो होतो. लांबवर नजर जाईल तिकडे म्हशी बसाव्या तशी काळी काळी मोठी दगडं. उजाड माळ मनाला रुकरुक लावीत होता.वाळलेल्या बाबळी अन् तरवटाची मुंडलेली खोङं सारखी टकामका बघत होती. सजीवांचा वावरच या माळाला माझ्याशिवाय मला दिसणासा झाला. पायातली कोल्हापुरी पायतान काढलं अन् डांबरीच्या कडला वाळलेल्या बाभळीखाली टेकलो. जीवाची घालमेल झाली उष्णतेने थैमान घातलेलं सुर्य वर बघू देत नव्हता. दहा-पंधरा मिनटं इसावा घेऊन निघावं या विचारात होतो. हातात घेतलेल्या बाभळीच्या काटकानं मनातले भाव डांबरीकडच्या पांढऱ्या मातीत उतरवत रेघोट्या मारत बसलेलो.शुन्यं नजरेनं आख्खा माळ धुंडाळून काढला. अचानक नजर गेली बाभळीच्या खोडावरच्या मुंग्यांच्या रांगवर शेजारीच मुंग्यांनी वारूळ केलं होतं. ही मुंगी आम्हा माणसांना खूप काही सांगून जाते.
"कसं होईल म्हणू नका दिर्घोद्योग सोङू नका"हा तिचा जीवनमंत्र
तिचा "आकार छोटा पण विचार मोठा"
मातीत तीनं खूप छोटी छोटी सुबक व मातीची शिखरं उभारली होती. माणसाप्रमाणेच स्वतःचं घर बांधण्यात व्यस्त असलेली मुंगी या वारुळात राहण्याची स्वप्ने बघत राबत होती. तिची कृती खरंच जिद्दीची.
नाहीतरी नुसते चांगले विचार मनात येऊन काय उपयोग "कृतीशून्य विचार नेहमी अर्थशून्य "असतात .हे मात्र नक्की. अपयशी माणसाच्या मनात इच्छा आणि अपेक्षा असतात तर यशस्वी माणसाच्या मनात नियोजन आणि कृती असते. या वारुळाची मोठमोठाली शिखरं बघितली आणि मनात शंकेचे काहूर माजलं नागोबा तर नसेल ना आत मानवी मनाच्या वृत्तीची उकल या वारुळाकडे बघून मला होऊ लागली. ज्या गोष्टींची माणसाला भीती वाटते त्या गोष्टीचं माणसाला आकर्षण देखील वाटते. पण ज्या आशेनं कार्य तत्परतेने ते वारूळ उभारण्यात मुंग्या मग्न होत्या त्या त्यांच्या घरात आयत्या बिळात नागोबा येऊन राहू शकतो. हे त्यांना कसं समजवावं हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आम्ही माणसं देखील जीवनभर स्वतः भोवती अशी अनेक प्रकारची वारूळ उभारतो.अन् चाकोरीच्या त्या भरलेल्या वारुळाच्या बाहेर पडतच नाही. आमच्यातील विचारांच्या मुंग्या वळवळल्या तरी त्या वारूळातच थंडावतात.गाडी,बंगला,बायका, नोकरी याच्यापलीकडे आमचं जगचं नसतं त्याच वारुळात राहून आयुष्याचा प्रवास संपतो. जो स्वतःसाठी जगला तो मेला.अन् जो इतरांसाठी जगला तो खरा जगला. कुणाभोवती पाटीलकीचं वारूळं तरं कुणाभोवती खासदार,आमदार, मंत्री पदाचं वारूळं. या वारुळात जीव गुदमरतो तेव्हा.........
लेखन आट्टाहास :
श्री. विशाल चिपङे(सर)
बावी(आ)ता.बार्शी
जिल्हा.सोलापूर
📞 8317250005
KNOWLEDGE CREATION
http://vishaltatyachipade.blogspot.in
No comments:
Post a Comment