KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Sunday, 8 April 2018

फड़

     
       
             झपा झपा पावलं टाकत चाललेलो. पाय टाकलं तसा फुफूटा उटायचा. वैजू ननावरेच्या घराच्या मागचं चमकी काटं तिसरा पारच्या उन्हात चमकत व्हतं. नेहमी भन्नाट दिसणारं बराड़ं आज माणसांच्या वर्दळीनं गजबजलं व्हतं. वरगळं उतरताना मला बामणाच्या पावातली माणसं दारात काड़लेल्या पांढर्‍या रांगोळीच्या गोल कड़्यासारखी दिसतं व्हती. सुर्यानं बी तोंड टाकलं व्हतं. दिसं उतारला व्हंता. समोरनं सायकलवरनं शर्टाचा किसा लाल भडक झालेला पैश्याच्या चिल्लरनं  भरलेला माणूस गप्प चालेला. पण म्याच म्हणलं "काय वं पावणं, संपलं काय "गारेगार.
तसं नुसतं ड़ोक्याला टापर बांधलेलं त्वांड़ हालवून भर्रकन निगून गेला.
   

मनात वाटलं आयला उगचं बोललो ह्याला... ....मला बोलायला त्याला काय पैसं पड़त व्हतं व्हयं. ...असा ईच्यार करीत करीत फड़ात कवा पोचलू ती कळलचं नाही. आन् आवाज कानावर पडला. बावीच्या हानमान तालमीचा पट्टया हाय बगं. ...तसा माझ्या पावलाचा वेग वाडला. माणसं माणसाला थटायली. कोणं टोपे तर कोणं धोतरे पायजमा शर्टाची गावच्या मातीतली रांगड़ी माणसं तोबा गर्दी. ... माणसांच्या गर्दीनं कुस्त्याचा फड़चं दिसाना मी तर पुरता हैराण झालेलो. माणसाच्या गर्दीत पैलवान शोधत व्हतो. पन् काय मेळं लागना. सगळी जत्रा फड़ावरचं तसचं ढकला ढकली करीत माणसांच्या गर्दीतनं  त्वांड़ बाहेर काढलं. तसं पंच कमिटीतलं पंच सिताराम नाना नवाट पैलवानास्नी खोबऱ्याचं टुकड़ं देताना दिसलं. त्या गर्दीत स्वतःला  सावरीत व्हतो तवर तरं. ....
"येळकोट....... येळकोट....घे घे घे घे....." आवाज कानावर पडला काय झाल कळलच नाही. माणसांच्या झुंड़ीच्या झुंडी पैलवानानच्या कड़नी कोण पैलवानास्नी उचलून घेतयं तर कोण भंडारा उधळतयं.माणसांची रेटा रेटी काय ती गर्दी.फड़ातनं धुळीचा कोट उटला. तस्ल्यात माजी एक चपलचं हारवली.  मोटरसायकली गाड्या टरका मायदाळं गर्दी. कोणं लंगोट सोड़तयं तर कोण कापड़ं घालतयं.सुपाऱ्या दावलेलं कान बलदंड शरीरयष्टीचं रांगड़ं पैलवान बगितलं आन् माझ्या बी अंगात स्फुरण चढलं. निकाली कुस्ती करणाऱ्या पैलवानाची वाहवा करणारी माणसं गावाची वाट धरत व्हती. अन् मी माजी गमावलेली चपल फड़ावर हुड़कीत व्हतो. पाण्याच्या लाटवनी माणसच्या माणसं अंदारात मागूनं पांढरी दिसत व्हती.फड़ात अंदारामुळं काईचं दिसत नव्हतं. पायातली हाई ही बी चपल सोडली अन् तड़कचं आणवानी गाव गाटलं. तसा कुस्तीगीरांनी गावच्या इशीत गर्दी केलेली बाया बापड़्या डोस्कीवर पदर घेऊन घराकड़ं निगालेल्या तर कुणी मदिरेच्या नशेत. शिट्या,पिपाण्या, खुळं जत्रतं लय हौसे गौसे. ...अन् रातीच्या मेंटलच्या बत्यासमोर हालगीवाल्यानं धरला की ताल ढांगळागं .........मचाळांग ......ढांगळागं. ....मचाळांग. ....कड़्काड़्काड़्काड़. मदीचं ढांबूक रापूकं ढांबूक रापूकं. ..गावरान मेजवानी कानाला ग्वाड़ लागायची. त्यात पुन्हा गर्दी वाट काडत आत शिरलो बगतो तरं काय ?   खंडोबा केसरी पै.गणेश(आप्पा)दिलीप आगलावे. जिगरबाज पोर्या करारी बाणा,बलदंड शरीर,भेदक नजर, हणमंती कुस्तीतला मास्टर,अंगात रग बी तसचं पंचक्रोशीत नावाजलेला मल्ल. गावातून भल्ली मुठी मिरवणूक. गावातल्या आया बाया अन् जाणत्या माणसांचं आशीर्वाद घेऊन मनात आलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरवणारा धरपड़ी मल्ल.राष्ट्रीय खेळाडू म्हणून देशसेवेत भरती झाला पुलीस म्हणून.
    तसा कुस्ती हा महाराष्ट्राच्या  लाल मातीत मुरलेला मर्दानी खेळ. कुस्ती म्हटलं की हिंदकेसरी मारूती माने,गणपतराव आंधळकर हे पैलवान आठवतातचं. शक्ती किंवा युक्तीनं समोरच्याला नामोहरण करणे.
 रामायण महाभारतात मल्लविद्येचा उल्लेख आढळतो. वनवासात असताना श्रीरामाच्या प्रेरणेने सुग्रीवाने मल्लयुध्दात वालीचा पराभव केला. तर महाभारतात श्रीकृष्णाने चाणूर,कंसाला मल्लयुध्दात धडा शिकवला. हीच मल्लविद्या "कुस्ती "या नावाने नावा रूपाला आली. हणमंती कुस्ती, भीमसेनी कुस्ती,जांबुवंती कुस्ती, फ्री स्टाईल कुस्ती असे कुस्तीचे विविध प्रकार आहेत. कलाजंग,ढाक,मोळी,गवालोट, धोबीपछाड,एक चाक हे कुस्तीचे ड़ाव पैलवानात चपळता व निर्णयक्षमता आणतात.तालीम म्हणजे पैलवानानचं माहेरघर तांबड़्या मातीत काव,राख,पाणी,लिंबू, ताक, तेल टाकून लाल माती निर्जंतुक व भुसभुशीत केली जाते."कुस्ती जगायला अन् जगवायला शिकवते."
1948 मध्ये लंडन येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खाशाबा जाधव या मल्लांनी भारताचं प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राच्या मातीत मुरलेल्या खेळाला राजाश्रय दिला शाहूमहाराजांनी अन् कोल्हापूरात उभं केला साठ हजार कुस्तीप्रेमी एका वेळेस बसून कुस्ती पाहू शकतात असा भव्य दिव्य " खासबाग " आखाडा .
महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक मारणारे पै.नरसिंग यादव , महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील असे मल्ल महाराष्ट्राची मर्दानी कला राज्य देश पातळीवर जोपासता आहेत.तर अश्या जिगरबाज मल्लांची ही शासनाच्या क्रिड़ा विभागाने दख्खल घेतली. अन् गावोगावी तालमी उभारल्या तर महाराष्ट्राची "मर्दानी कुस्ती "जीवंत राहिल.
स्त्री कुस्ती प्रकारात ऑलिम्पिक मध्येही भारताचं प्रतिनिधित्व करणारी साक्षी मलिक कास्य पदकाची मानकरी आहे. ही "दंगल " गावा गावात व्हायला हवी.महाराष्ट्र एकूण तीन फड़ासाठी प्रसिद्ध आहे. "तमाशाचा फड़, ऊसाचा फड़ अन् कुस्त्याचा फड़" तरूणानी ठरवावं कोणत्या फड़ात जायचे ते.

*लेखन अट्टाहास:* 
        श्री.विशाल चिपड़े
         बावी(आ)बार्शी सोलापूर
        📞 83172 50005
KNOWLEDGE CREATION http://vishaltatyachipade.blogspot.com/

2 comments: