KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Friday, 18 May 2018

कुलूप(लाॅक)



            रसरसत्या इसत्यावर  आक्कानं पापुडा आलेली भाकरी शेकली. काटवट धुतली अन् उखळात कांङलेला हिरव्या मिरचीचा ठेसा भाकरी वर घातला. लोणच्याची फोड ठिऊन भाकरी दुमडली.अन् आक्कानं हाक मारली.आरं...!  "विशाल, भाकरी बांधायला फङकं आणं" पांढरं.....
 
   
मी कट्ट्यावर घराबाहेर  मोबाईल बघत होतो. पण काय केल्याने मोबाईलचं लाॅक काय निघता निघेना. अर्धातास झालं लयं आबदलो. पणं छ्या. .....! मोबाईल मधलं सगळं नंबर, माहिती,चित्र बंदचं. की या सगळ्या पळापळीत आक्कानं पुन्हा एकदा  आरोळी ठोकली  आरं विशाल भाकरी बांधायला .......
 फडके घ्यावं म्हणून मी उठलो आणि खोलीजवळ गेलो. तर काय खोलीला (लाॅक) कुलूप. रानात भुईमुगाला पाणी द्यायला गेल्यावर किल्ली हरवली होती. दगडाच्या दहा-पंधरा ठोक्यात कुलूपचं तोडलं. हाताच्या बोटावनी दिसणारा कुलूपाचा कोयंडा दगडाच्या मारानं पुरता वाकडातिकडा झालेला होता. त्याला जीव असता तर त्यानं मला तिथचं चिचून काढलं असतं. एवढी बेकार आवस्था केलेली म्या त्याची.
       दार उघडून कपाटाजवळ गेलो तर कपाट "लाॅक"शेवटी भाकरी कागदाच्या वळकटीत बांधल्या. मोटार सायकल वरून बार्शीला जाणार होतो. बघतो तर काय हँडल लॉक कुलपात चावी घालुन गाडीला किक मारली. शेलगावच्या पुढे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून जाणार तर "पेट्रोल पंप बंद आहे." अशी पाटी वाचली. त्या पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कामगाराला आरोळी ठोकली आणि विचारलं
"काय झालं पावणं" त्यानं हात वर करून सांगितलं मशीन "लाॅक" झालयं तसंच क्लच धरवड धरवड करीत बार्शी गाठली. स्टॅण्डमधी गाडी पार्किंगला लावताना पार्किंग वाला मला म्हणाला गाडी "लॉक" करा .मी त्याला काहीच न बोलता गाडी लॉक केली. औरंगाबाद ला जाणाऱ्या गाड्या माणसांनी कोंबून भरलेल्या पाण्याची बाटली घ्यावी म्हणून दुकानात गेलो. तर दुकानदार म्हणाला "साहेब, रात्रीच्या आकरा वाजलेत दुकान "लॉक" केले आता..... "काही न बोलता बार्शीच्या स्टॅंडवर माझी अन डासांची चालू झालेली जुगलबंदी तोंडावर अंगावर हात फिरवून फिरवून पुरता वैतागलो होतो.ङोळं झुपीनं तरवाटलं व्हतं.  कपाळावर आठ्या आणून भुवया उंच करून स्टॅंडवरच्या घड्याळाकडे किती वाजल्या बघावं म्हणून उठलो. बघतो तर काय आठ वाजल्याल्या. जरा जागं हून घड्याळा जवळ गेलो. तर ते बंद पडलेलं.काचच्या केबिन मधी बसलेल्या साहेबाला विचारलं "घड्याळाला काय झालंय सायब?"तस सायबं  म्हणलं "लॉक" झालयं.बस यायच्या आत पैसे काढावं. म्हणून एटीएम कडे गेलो तर जगू मेजर म्हणलं "सर एटीएम लाॅक झाले."रात्रीच्या दीड वाजता गाडी आली स्टॅंडवर झोपली माणसं कुणी तंबाखू खात पिचकाऱ्या मारणारी, बायका लेकर, सगळी कशी पळत सुटली. गाडी थांबली तरी कंडक्टर दार उघडीना .एक आजोबा खाकरलं......"ओ, दार उघडा. की  आतनं एक प्रवासी म्हणाला कंडक्टरनी "लॉक" केलंय. दुसऱ्या गाडीने पहाटे चार वाजता जत मध्ये पोहोचलो. बाहेर गेट ला लॉक होतं. उङी मारून आता आलो.बॅगच्या  चैनीणीच्या कप्प्यात हात फिरवला.तर रूमच्या लाॅकच्या चाव्या गावी विसरल्या होत्या. आता मात्र मीच "लाॅक" झालो.
        कुलुपावर शेजाऱ्यांपेक्षा जास्त विश्वास अपला. म्हणजे चालत्याबोलत्या माणसांवर नाही पण निर्जीव गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. काय गमक आहे या कुलपाचे हे उपकरण खरंतर "सुरक्षा"प्रदान करतं.
         कुलूप हे "आव्हान"  व "सिद्धता" या तत्वावर काम करते.  आपल्या जवळची मौल्यवान व गरजाधिष्टीत सर्व वस्तूंचे जतन करण्यासाठी कुलूपाचा वापर केला जातो. आत प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आपली सिद्धता सिद्ध करावी लागते.तरच तो आत प्रवेश करू शकतो.त्यासाठी चावीचा वापर करावा लागतो. चावीच्या खाचा कुलुपाच्या आतील खाचेशी एकरूप व्हाव्या लागतात. तरच (लाॅक) कुलूप उघडते. पूर्वीच्या काळी शत्रूपासून आपले संरक्षण करण्यासाठी दरवाजाच्या आत डाव्या व उजव्या भिंतीमधील खाचात भलंमोठ लाकूडं आडवं सरकवलं जायचं.ते कुलूपच होतं होतं. "कुलूप" ही संकल्पना खरंतर मानवाच्या सुरक्षिततेबाबतचे द्योतक आहे. असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. चांगले उपयुक्त मौल्यवान असे ते सारे जतन करायचे. हा माणसाचा स्थायीभावचं आहे.पण अनेकदा त्यातून चांगले ते सगळे आपल्याला हवे ही वृत्ती बळावत जाते. विशिष्ट पद्धतीने उघड-बंद करता येण्याजोग्या या साधनाच्या वापराची युक्ती कमालीची ठरली. केवळ अडकणीच्या स्वरूपात असलेल्या या साधनाचे अक्षरशः हजारोत गणना व्हावी एवढे प्रकार अवतरले. घराची तटबंदी किंवा तिजोरीची रचना कितीही मजबूत केली. तरी जोपर्यंत त्यावर कुलुपाची योजना होत नाही. तोवर तिच्या सक्षमतेला जणू काही अर्थच नसतो. पण एकदा का कुलूप लावले. की विश्वासाची किंवा निर्धास्तेची  "गॅरंटी" येते विविध काळात विविध नाना तर्‍हेची "कुलूपे" पहावयास मिळतात. कुलुपाचे विविध प्रकार त्यामध्ये नळकांडी कुलूप, दांड्याचे कुलूप,रीम कुलूप,अंगचे कुलूप, चुंबकीय कुलूप,टर्नर कूलुप,वेफर कूलुप,कि-कार्ङ कुलूप,अंकरचना कुलूप,सायरनं(आवाज करणारं)कुलूप.
 तंत्रज्ञानाच्या युगात विविध साधनांना पासवर्ड ही दिला जातो. हे देखील कुलूपच"आहे. आजही समाजात अनेक तोंडाच्या कुलुपाच्या चाव्या असतात.पण त्या कुलूपाला लागल्या तर........

 लेखन अट्टाहास :

           श्री विशाल चिपडे (सर)
            बावी(आ)ता बार्शी 
            जि सोलापूर
          📞8317250005
KNOWLEDGE CREATION 
http://vishaltatyachipade.blogspot.in

2 comments: