पांढरा सदरा काळा झ्यार झालेला.रस्त्यावरची पांढरी माती ङोळ्यात गेल्यानं ङोळं धुळीनं गच्च भरलेलं.सुर्य ङोस्क्यावर आलेला तीन तासांच्या चित्रपटासारखी एक एक वाङ्या वस्त्या ङोळ्या म्होरनं जात हुत्या.आख्खा माळ दुष्काळानं व्हरपळला होता.वाळलेली कुसळं दुपारच्या उन्हात मनाला लयं टोचायला लागली.राजूनं गाडी थांबवली तसा निरगुङीच्या झाडाखाली मी बसलो.कष्टाचं चीज हुईल औंदा .... पोराहू कुण्या गावचं म्हणायचं? डोसक्यावरची टोपी सरळं करीत मधुतात्या बोललं. हातातला कोयता वावरात टाकला.अन् शिळी अन् म्हशीच रीङकू यालताराला गुतीवलं. इमानी गङी.वरल्या बांदाला रामकटी खाली खोप हाय बगा आमची.दोन शेळ्या,एक म्हस रिङकू आन घरात बाजरीचं दोन पुती दानं. नेटका परपंचं म्हणायचं.पोटापुरती जिमीन हाय पावसाच्या भरवश्यावर. यंदा दुष्काळं पडला. ऊस पाण्यावाचून व्हरपळला.कार्तिकात ही हाल चैता वैशाखात लयं तारबळं भाऊ जीनं नकु झालयं. पोट भरावं का जित्राब संबाळावी.
वेड़्या आशेनं वर्षेभर काळ्या मातीत मरायचं.शेताच्या आधारावर संसाराच्या बेरजेची गणित ठरवायची अन् ती वर्षाअखेरीस कधी भागाकारात बदलतात.फाटक्या संसाराला शेतातल्या उभ्या पिकाच्या जोरावर ठिगळं जोडायची. कळतचं नाही. खताचे, बियाणाचे, शेती साधनाचे सगळ्याचे भाव फिक्स अन् प्रिंटेड़ मग सोनं पिकवणार्या बळीराजाचा शेती माल मात्र तोंड भांडवल करून पैसा कमवणार्यानी ठरवायचा.आमच्या शेतकर्यांला कधी "बळीराजा"होऊच दिला नाही. त्याचा यंत्रणेने नेहमीच "बळी "घेतला. कृषिप्रधान भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. ती शेतीवर अवलंबून आहे. आमच्या गप्पांना रंग भरला व्हता. ....
आयुष्यभर काळ्या आईशी इमान राखून रक्ताचं पाणी करून *ऊसाचं टिपरू* शेतात जपायचं वाढवायचं. अन् ते कारखान्याच्या चरख्याखाली चिरडलं की गोड रस काढून घेतात.अन् उरतो चोथा शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा......!
मधुतात्यांच्या डोळ्यातील पाणी ऊसाच्या पाचुटावर पड़त व्हतं. त्या पाचूटावरून ओघळणार्या अश्रूत आयुष्यभर जित्राबावानी राबून राबून दमलेल्या कोंडलेल्या भावना स्पष्ट दिसत व्हत्या.
पणं आम्ही बी आता आमच्या पोरांना सावलीतलं चार घास खावं अस वाटतय.नकू नकू झालयं हे श्यात ....आमचं तर गेलं आयुष्य. कधी निसर्गाचं संकट तर कधी माय बाप सरकार. .मुसक्या आवळल्या बैलासारखं जीन शेतकर्यांच........ मधु दाईगङेच्या तोंडून अनेक
शेतकरी बापाच्या व्यथा मनाला भेदून जात व्हत्या.नकळतं आम्हाला आमचा बाप आठवला.
"ऊसाचं टिपरू "पिकवणारा.
*लेखन अट्टाहास*-
विशाल चिपड़े.
बार्शी सोलापूर
📞8317250005
No comments:
Post a Comment