KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday, 28 March 2018

रामकट

             
          माळावर रस्त्याकड़ला वाळलेली कुसळं,अन् पानगळ झालेली झाड़ं. *दुस्काळ*लांबवर चिटपाकरू बी दिसत नव्हतं. दिवस दुपारीला आलेला सुर्य आग वकतं व्हता.घामानं पुरता भिजलेलो,घसा कोरडा पडला होता. ईसावा घ्यावा ह्या इचारानं बसलो. बगतोयं तर वर
                    " *रामकट*"  शेताच्या बांधावर बाबळीचं झाड आसतचं की  इथलं मातीचं बांध,एकाद्या गारपीटीनं नायतर अवकाळी पावसानं धुवून गेलं की, मग
शेताचं बाध वळकायला अश्या रामकाटी,बाबळाचा उपयोग होतो, असे आजोबा सांगत व्हतं.



बारकं होतो तवा आजोळी शेतात फिरताना, बाबळीच्या झाडाचं काटं बगून भ्याच वाटायचं. लईदां पायात
मोड़णारा काटा हीच असायचा. मराठी पिच्चरमंदी बी, नटीच्या पायात हीच काटा मोड़ायचा.अन् नट तो बाबळच्या काट्यानचं काड़ायचा.
इच्यार करीत रामकाटी खाली कवा लैड़लो कळलचं नाही. "रुतलाबाई काटा कान्हाने काडीला"गावटी आवाजात गौळण म्हणणारे
 इशीतलं भास्करनाना आटवलं.
  बाबळीवर सुगरणीची घरटं दिसलं.
रस्त्याच्या बाजूनं शेताला कुंपण म्हणून बाबळीच्याच फंजाऱ्या  लावलेल्या असायच्या. त्यातलं काटं बघून, त्याच्या
जवळ जायच धाडस बी व्हायच नाय.
पण बाबळीचं तसं लयं उपयोग असायचं. आजोळी, माझी आजी घरीच दातवण करत हुती.अन्  तिच्यासाठी तिला बाबळीची साल लागत व्हती.आबा मामा बरोबर जाऊन मी ती गोळा करुन आणीत व्हतो.
त्यायेळी आम्ही बाबळच्या झाडाचा डीक बी गोळा करायचो.  फाटलेली पुस्तक चिकटवायला हा डिक लागायचा.असचं तो तोंडात घालून चघळायला पण मजा यायची. दाड़ाला दाड़ चिटकून बसायची. याच डीकाचे लाडू पण करायचो.

बाबळीच्या लाकड़ाचं चांगलं जळण पण व्हतं. त्याची उष्णता दमदार आस्ती अन् ते लई उशीर जळत राहतं. घरच्या स्वयपाकासाठी बाभळीची लाकडं आणायचो. सोलापूर,कोल्हापूर अन् नगर मराठवाडय़ात
 ती पिवळी गोल फूलं येणारी बाबळ. एप्रिल महिन्यात हि झाडं पिवळ्याधम्मक फूलांनी भरुन जात आसते. वळवाच्या पावसाआधी भरुन आलेल्या आभाळा म्होरं बाबळं लईचं झ्याक दिसत व्हती.
खरं तर ते एक फुल नसून, लई "फुलांचा गुच्छ" असतो.

पुढं पुढं त्या झाडाला शेंगा बी लागलेल्या दिसतात.

तिथं त्या बाबळा हायत्या त्या  खडबडीत खोडाच्या .त्याच्या सालीच्या चिरात लयं किडं,मुंगळं दिसत. पण त्यापरास येगळं प्राणी त्या झाडांवर दिसत नव्हतं      माकडं  पण या झाडावर दिसत नसतं मामाच्या शेतात आंब्याची  चिचची भरपूर झाडं व्हती. त्यामुळं बाबळीच्या  झाड़ाकड़ं      त्यांचं आणि आमचं बी लई लक्ष जात नव्हतं.
पुढं हिंडताना  फिरताना भटकताना, तिथंही मला बाबळीची बरीच झाडं दिसली.

ही माझ्या नजरचा दोष हाय का ते मला माहीत नाही, पण तिथल्या बाबळी मला, सोलापूरच्या बाबळींपरास      जास्त पानावलेल्या दिसल्या.        तसचं सरळसोट फांद्या असणार्‍या  "रामकाठी" बाबळी पण तिथं दिसल्या.
कोकणात मात्र तितक्या बाबळी दिसल्या नाहीत. तिथं कवचित  दुरंगी बाबळ दिसते. सावंतवाडीला "मोतीतलावाच्या"ड़ाव्या अंगाला  बाबळचं  मोठं झाड हाय.     तिकडं ती फक्त फूलांसाठी वाढवलेलं हायं. सगळं  झाड गुलाबी पिवळ्या फूलांनी भरुन येतं .त्या येळला ते लय ग्वाड़ं  दिसतं.

बाबळच्या
फूलातला जी  गुलाबी भाग असतो तो सध्याकाळी पांढरा व्हतो. आणि रात्र पडल्यावर तो जरासा चमकतो सुदा. या जादूगिरीत, या झाडाचा, दिवसाचं आणि रातीचं दोन्ही प्रकारचं किटक आकर्षित करुन घ्यायचा हेतू असणार.

या गुलाबी पिवळ्या रंगाप्रमाणचं लाल पिवळ्या रंगाची पण बाबळ असल्याचं वाचलं  व्हतं, पण मला ती कधी बघायला मिळाली नव्हती.

जतला आल्यावर मात्र बाबळीची नव्यानं वळक झाली.
जतच्या पुर्व भागातल्या बाबळीच्या झाडाचा एक सर्वसाधारण आकारही ठरलेला हाय. एक उभा सरळसोट बुड़ आणि त्यावर जमीनीपास्न काही उंचीवर सगळ्या बाजूनी  फूटलेल्या फांद्या. वरलाकड़चा भाग कमी पानाचा पण वरची बाजू मात्र सपाट.

या झाडाची अशी का वाढ व्हती. याचंही कारण हायं.आधी त्याच्या बिया हितं कश्या उगवतात.
बाबळीचं  बि या पौष्टिक गराचं आसतं. आन् ती  शेरडं मेंडरास्नी लई आवडतं. या झाडांना फ़ूलं
आली आन् शेंगा कोवळ्या असतानाच लई किड़ं त्याज्यावर  आंडी घालतात. या किड़्याच्या अळ्या
या शेंगातच वाढतात. या अळ्या म्हजी ह्या बाबळचं दुष्मनं. कारण त्या शेंगातल्या गरासंगटचं  ब्या बी
खाऊन फस्त करतात. म्हंजी या अळ्यांच बंदोबस्त करायला हवाचं, आन् मग हे काम हे झाड एका खास
दोस्ताकडून करुन घेतं.

या अळ्या ईवूच नये असी व्यवस्था करणं या बाबळला शक्य नसत. कारण परागीभवनासाठी किड़ं
तर लागणारच. या शेंगा माकडांचा पण आवडता खाऊ. बाबळवर ठिय्या दिऊन, हातानं एकेक शेंग तोडून माकडं
खात असतात. पण माकडांचाही तसा या बाबळला उपयोग नाही.  कारण माकडं शेंगा खाताना त्या चावून
चावून खातात. अश्या चावण्यात  अळ्याही भरडल्या जातात आणि बियाही.

पण माकडं लयं नासधूस  करतात. अन् लयं  शेंगा उगाच तोडून बाबळंखाली टाकतात. आणि मग या
बाबळच्या दोस्ताचे म्हजी शेरड़ं मेड़राचं काम सुरु व्हतं.शेरड़ास्नी पण लयं  शेगा आवडतात. आपल्या दोन पायानं  या झाडाखालच्या शेंगा लगेच काड़ून  घेतात.

शेरड़ाच्या पोटातल्या  पाचकरसानं या शेंगातील अळ्या मरुन जातात, पण ब्या मातर  राहतात. शेरड़ाच्या
अमाप फिरस्तीत ह्या ब्या लाम्ब   जातात आणि विसर्जित व्हत्यात  .
आता  ह्या ब्या सुरक्षित झालेल्या असत्यात. अळ्यांचा बंदोबस्त झालेला आसतोच आन्
शेळ्याच्या लेंड़ीच्या रुपानं , त्यांना आयतेच खत मिळालेलं आसतं. परतं  जर पाऊस पडला, तर या ब्या
लई जोमानं येत्यात्या ..... *रामकाटी*

लेखन अट्टाहास 
                   श्री. विशाल चिपड़े
                   ता. बार्शी सोलापूर 
                📞 9422033819.

No comments:

Post a Comment