KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 29 March 2018

भामाई



      भड़ा भड़ा आवाज येत हुता.रांजून वरन वसांड़ून वाह्त व्हता.भामाईनं पहाट्चं उटून सगळा आड़ उपसीला व्हता.जशी वार्‍याची झुळूक इल.तस लय गार वाटायचं.जात्याच्या पाळीला बांधल्यालं शिळीचं कुकरू थड़ीनं गाराटलं व्हतं. एकाच दोरखंड़ाला बांधलेल्या दोन शेळ्या भामाईनं पहाटचं पिळल्या व्हत्या.          पोतरा दिलेल्या वाकलेल्या कुड़ाच्या भितीवर पवरा अन् दावं आड़कीवल्याल.पाच सहा लाकडाच्या मिड़ी रवून चार पत्र्याच्या दोन वड़ी.बाबळच्या लाकड़ाची चौकट.
   
 
  कुत्रं मांजार घरात शिरूनी म्हणून भामाई दाराला ठिक्याचा तळवट लावायची.पाच सहा मसरं,दोन बैलं,दोन रेड़कं, झापाखाली कोंडलेल्या वीसीक कोंबड्या,अन् घरात लेकरा बाळासहीत खायची पाच तोंड एवढा सगळा रामरगाड़ा संबाळून भामाई शेजारच्या पारा काकूच्यात जुदूळा काढायला सावड़ीनं जायची.
       घरासमोर एक चिचच झाड़ व्हतं झाडाखाली दुपारच्या पार्यात भामाई तिच्या माहेरच्या आठवणी सांगायची.आम्ही नातवंड़ भामाई आणलेली ऊस,बोरं,जांभळ,मकाची कणस ,ढाळं,पेरू,गाजर ,ऊस या रानमेव्यावर ताव मारतं बेभान होऊन ऐकत होतो.         भामाईचं वड़ील(आण्णा)म्हणं ताकदीचं पैलवान व्हतं सार्या मोहल्यात त्यांना जोड़चं नव्हता.रांगड़ा आडदांड गड़ी सोळा मणाचं पोतं म्हणं कैवळ्यात उचलून वाड़्याची सदर चढायचा.
    जवारीची रातची शिळी भाकर अन् म्हशीचं आकरी दुधं ही भामाईची न्याहरी दुध दुपतं खात्यापित्या घरची म्हातारी मोटाड़ं हाड़ाची व्हती. सत्तरीच्या घरातली पण आजून सकाळी दोनं म्हशी पिळून शेण झालवट करून सगळ्या कामाचा फडशा पाडायची.
        रांजणावर ठेवलेली तौवली वाऱ्यामुळं सारखी खड़ं खड़ं वाजत व्हती.पहाटंच्या गार वार्यात "ओम श्रीराम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान "असा बारीक खोलवर सुर ऐकू येत व्हता.  तर मधीच कुत्री भुकल्याचा आवाज यायचा.       बहुतेक पहाटंची "रामफेरी" असावी असा मी अंदाज बांधला. खाल्या गल्लीला सुताराच्या नेटावर ही रामफेरी नामा पाटलाच्या घरासमोरच्या राम मंदिरातनं निघायची.  सगळ्या गावातन राम नामाचा गजर करीत पहाटेचं वातावरण अल्हादायी व प्रसन्न करून टाकायची. रामफेरी घरासमोर अंगणात यायच्या आत गावातल्या सगळ्या जणी आपापल्या घरासमोर शेणाचा सड़ा टाकून रांगोळी काढायच्या. 
           गारट्यामुळं लेपाट्याच्या बाहेर तोंड काढायला नको वाटायचं.
       भामाई पत्र्याच्या वरच्या वडीत भाकरी करत व्हती पांढर्‍या मातीचा पोतारा दिलेल्या चुलीत शेणाच्या गौर्‍याचा इस्तू रसारसा करायला व्हता. हिरव्यागार गायीच्या शेणानं सारवलेला परवर न्यार दिसत व्हता. पापुद्रा आलेल्या भाकरीनं टोपल्याची शिग लागली व्हती. हिरव्यागार मिरच्यात लसणाच्या कुड़्या घातलेला उकळात कांड़लेला ठेसा जर्मलच्या पितळीत करून ठिवला व्हता. पांढर्‍या फटक्यात बांधलेलं घट्ट दही माझी वाट बघत होतं.
      मी लेपाट्यातनं तोंड बाहेर काढणार तितक्यात भामाई खेकसली. .ये ये ये ये लक्ष्मणा आरं उठ मर्दा $$$$दिसं कासराबर वर आलाय बघं. तुम्ही सेरातली माणसं कुठवर बी झोपता. मड़ळीला बी उठीव तुझ्या कवाची झोपती म्हणावं बायाच्या जातीनं लवकर उठून सड़ा सारवानं करावं.सुर्यनारायण उगवायच्या आत घर धन्यान अन् लक्ष्मीनं सवळं उरकून तयार व्हावं. तुळशीला पाणी घालावं. दिसभराच्या कामाची जुळणी लावावी. ऊठला का? तुम्ही शिकली सवरलेली पोरं अशी कशी आळशी रं. त्या अंबादासाला बी ऊठं म्हणावं.जित्राबास्नी वैरण काड़ी टाक म्हणावं. मी उठलो अन् तड़क चुलीला दोन पाय लावून शेकत बसलो. तशी भामाई खेकसली आरं ऊठं मुड़द्या. चार पुस्तक शिकलास नव्हं. आसं बसत्यात का ?
     खरचं हाय भामाईचं...........आज आम्ही शिकलो सवरलो.नोकरीला लागलो.बंगला,गाडी,नोकर,चाकर सगळं सगळं आहे.

पण, चुकलो(व्यसनी झालो)तर प्रेमाने रागवून मुड़द्या म्हणणारी........ 

आपल्या आवडत्या राणीला बायकोला(घरी जेवायचे बाहेर नव्हे)"स्त्री "त्वाचे शहाणपणाचे डोस पाजणारी......

 आमच्या बछड्याला राम ,कृष्ण भीम, अर्जुनाच्या पराक्रमाची, शिवरायांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी.........(इसाप नितीच्या नव्हे)

आम्हाला सिमेंटच्या जंगलात (पिझ्झा,बर्गर,मंचुरीयन,फास्ट फुड़ नव्हे) फ्लॅट मध्ये चुलीवरची पापुड़्याची भाकरी,ठेसा अन् दह्याची न्याहरी करायला देणारी...........

आम्हाला दिवसभराच्या कामाचं नियोजन करून देणारी.........(नातेवाईक,मित्रमंडळी, गाव हे पण आपले आयुष्य आहे )

घरातली माणसं,जित्राब संभाळून फाटक्या संसाराला जिद्दीने ठिगळं जोडणारी.......(कष्टा शिवाय पर्याय नाही,जबाबदारी शिवाय प्रगती नाही )

मक्याची गावरान कणसं,ढाळं, बोरं,पेरू,ऊस हा गावरान मेवा आहे हे सांगणारी...........(शेवपुरी,भेळपुरी,साॅस,भेळ नव्हे )

आयुष्यासाठी पैसा कमवायचा अन् संकरीत खाऊन (आरोग्यावर पैसा घालवायचा )असं सांगणारी सत्तरीतली.......

रामफेरी आल्याची चाहूल देणारी.......... (पाश्चात्य गाणी म्हणारी नको)  "भामाई " कुठाय ?
 
वाट पाहतेय                                               "वृध्दाश्रमात" ........  खरचं आज आम्ही आमचं जगणं विसरलोय का?

"काट्याकुट्याचा तुड़वित रस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.
तिथं उन्हात,उन्हात लढत्यात माणसं,
तिथं मातीत,मातीत मळत्यात माणसं.
त्यांच्या घामाचा भाव लयं सस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.....!"

लेखन अट्टहास :
  श्री. विशाल चिपड़े(सर)  
    बावी(आ)बार्शी सोलापूर  
      📞  9422033819.

No comments:

Post a Comment