माणसं निघून जातात. पण विचार मात्र जीवंत राहतात. कित्येक पिढ्यासमोर दिपस्तंभागत.कोल्हापूर शूर वीरांची राजे रजवाङे व समाजसुधारकांचा वारसा लाभलेली भूमी.
कोल्हापूर म्हटलं की आठवतो रांगङा बाज अन् लिबाज, अस्सल कोल्हापूरी पायताण , ठसकेबाज लवंगी मिरची- कलावंतांची नगरी , लाल मातीतली कुस्ती अन् तांबङा-पांढरा रसा.खरं तर सुलतानी गुलामगिरी विरोधी स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवरायांनी दिला.अन् जातीयवादी विरोधी समानतेचा लढा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिला.शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील एक प्रमुख नाव म्हणजे
कृतीशील विचारवंत सत्यशोधक विचारसरणीचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
तिकीटं काढली अन् गेटमधून आत प्रवेश केला.भव्य अन् दिव्य राजर्षी शाहू पॅलेसची इमारत पाहिली अन् तब्बल शंभर वर्षापुर्वीच्या राजघराण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात मन गर्क झालं. छत्रपती शाहू महाराजांचा दरबार, आसनव्यवस्था ,जुन्या आलमार्या,लाकडी सोफे,युध्दात वापरलेल्या सहा सहा फुटी तलवारी, नाना तर्हेच्या बंदुका,भाले बिचवे, जरीचे कुर्ते,पोशाख,युध्दात वापरायचे चिलखत,त्या काळातील राजमुद्रा,नानी नोटा, पंच धातूची भांडी प्रत्येक जीनस हा जीवंत इतिहासाची साक्ष देत होता.राजवाड्यांतील शेकङो वर्षापूर्वीची तैलचित्रे,वाद्ये,कलाकुसरीच्या वस्तु इत्यादी त्यांच्या रसिक मनाची साक्ष देतात. रानङुक्कर,गेंङा,जंगली म्हैस,वाघ,सिंहाच्या कलाकृती त्यांच्या शिकार करण्याच्या छंदाबद्दल बोलत्या होतात. तर त्याकाळची त्यांची ग्रंथसंपदा ,लेखणीचे नमुने,वटहुकूमच्या प्रती शिक्षणप्रेमी मनाची पोच पावतीच आहेत.राजवाड्यांचे चुन्यातल्या भरभक्कम भिंती पाहिल्या अन् मनोर्यावरचे घंट्याला घंटानाद करणारे घङ्याळ पाहिले की महाराजांच्या द्रष्ट्या व्यक्तीमत्वाचा प्रत्यय येतो.
शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण, जातीभेद निवारण अन् सत्यशोधक विचारसरणीचा स्विकार करून तत्कालीन परिस्थितीत कोल्हापूर संस्थानाचा एक वेगळाच दरारा निर्माण केला होता. लोकशिक्षण हाच लोकशाहीचा पाया मानून समाजातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांना शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय केली.उपेक्षितांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.उच्च शिक्षणासाठी गरजुना सहाय्य करणे. स्त्रीयांना मोफत शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून स्त्री शिक्षणाचा पाया शाहू महाराजांनी घातला.
प्राथमिक शिक्षण सर्वाना मोफत व सक्तीचे करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची इतिहासाला दखल घ्यावी लागते.शाहू पॅलेस सारख्या प्रेरणास्थानांचं संवर्धन व पुन्नरोजीवन भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची साक्ष देईल.
- विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
हॅलो- 8317250005
No comments:
Post a Comment