KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday, 14 April 2020

बस स्टॅण्डवरील एक रात्र



           दिवाळी संपून गावाकडं तर कुणी पाहुण्याकङं रंगीबेरंगी कपडे घालून प्रत्येकजण स्टॅण्डमधी आलेल्या लालपरीची एस्ट्याचे बोर्ड न्याळतं होता. नेहमीप्रमाणे बाईसाहेब राजकुमाराला घेऊन सिमीटच्या बाकड्यावर ऐटीत रिलुन बसलेल्या तर ही प्रत्येक गाडीचा बोर्ड बघून हेलपाट्यानं बेजार झालेलं.मदीच एकादी
" शिवशाही " तर कधी " भेटी लागे जीवा " असं लिहिलेली एस्टी यायची.
                      बारकी लेकरं थंडीन गारटलेली तर काही आईच्या पदरात दङलेली होती. स्टॅण्डमधी असलेल्या झाडाची पान बी आता हालत नव्हती.
परिवहन महामंडळाचे फलक रात्रीच्या लाईटीत ठळकच दिसत व्हतं. दवाखान्याचं,सोनं चांदीच्या दुकानाचं जाहिरातीचं मोठ बार्ङ मला बगा मला बगा करीत व्हतं.
                       टिंग ट्यांग कृपया लक्ष्य द्या. गाडी नंबर दोन शुन्य सात तीन अमरावती कोल्हापूर ही गाडी फलाट नंबर चारवर लावणेत आली आहे. असं सांगणारी बाई बी आता झोपली होती. कशी निरव शांतता पसरली होती.फक्त शिवशाही गाङीवर काढलेले घोङेच तेवढे पळताना दिसत होते. दिवसभर सरकारी हापीसात काम करणारे पांढर्‍या काॅलरचे सरकारी बाबू मोबाईल चापचण्यात दंग होते. बसण्याची जागा येथे झोपू नये. असं लिहिलेलं बाकड्यावरचं माणसं आडवी झाली होती. प्रवासात ताटून गेलेली म्हातारी कोतारी माणसं कुणी बाकड्याखाली तर कुणी मध्येच वावरात पसरल्यावणी आडवी तिङवी पङली होती.
                      चौकशी काऊंटर केबीनमध्ये बसलेले लाॅगशीट भरणारे झोपीच्या तंद्रीत कागदावर आकलेल्या घरात एक आकडा खाली तर एक वरी खाङाखुङं करत दुरुस्ती चालू होती. मधीच एकादया प्रवाश्यांनं गाडीची चौकशी केली तर म्होगमं ठरलेलं उत्तर देयचे हाय आरदा तासानं. ....आजून आली नाही गाङी इलं.रात्री दीड वाजलेल्या काहीजण भिंतीवर लावलेलं वेळापत्रक बघत व्हते .व्हा व्हा करून काहीजण जांबळ्या द्यायचे.तर काही हाता पायाला तराटं दिऊन आळस झटकायचे.दिवसभर ठिक्याच्या झोळ्यात गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या उश्याला घेतल्याने कङाकङा वाजल्या की रात्रीची शांतता भंग व्हायची.
                       ठिकी, बोचकी, गटूङी बॅगा,शबनम नाना तर्हच्या पिशव्या कुणी अंगाभोवती कांबळा गुंडाळून एकटक नदर लावलेली. दोन चार टुकार तरणी पोरं मात्र पोलीस गाडीचा राऊंड गेला की पुन्हा बाकड्या समोरच्या ऐगलवर बसायची.
                        काही जणांनी चपला उशाला घेतलेल्या तर काहीनी बॅगाच्याच उश्या केलेल्या. कोण धोतरे तर कोण पटके, इरकल,छापील नाना तर्हची कापड घातलेली माणसं. तर नवी लगीन झालेली आपल्या प्रेमाचं सामाजिक प्रदर्शन करणारी जोडपी गळ्यात गळं घालून पेंगत व्हतं तर काहीनी मुंडकी गुडघ्यात घालून बॅगा पायाखाली घेतलेल्या घड्याळाचा काटा मात्र थांबायचं नावाचं घेत नव्हता. तर मदीच एकादा ङ्रायव्हर कंडक्टर आंघोळ करुन आलेला दिसायचा. साळतं जाणारी तरणी पोरं भिताङावरचे बंद पडलेल्या लाईटच्या स्विचला मोबाईलचा ङबा चार्जीग करायला धडपड होती.ती सोडली तर सगळं एस्टी स्टॅण्ड निद्रिस्त झालेलं कागदावर काढलेल्या चित्रावणी दिसायचं.
                           भारत सरकारची जुनी पत्रपेटी मात्र आयुष्याची घरघर लागल्यागत भिंतीवरून सगळं स्टॅण्ड न्याळत होती. कर्रकर्र असा गाङीच्या ब्रेकचा आवाज आला की माणसं खडबडून जागी व्हायची.गारटा लागूनी म्हणून काहीनी रुमालान तर काहीनी टावेलानं तोंड बांधलेली. मधीच बङ्या बापाच्या औलादी स्काॅङा, स्काॅरपीओ गाङी घेऊन कुणाला तर न्यायला सोङायला यायचे. रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांनी बी स्टॅण्ड मधल्या बाकड्याखाली तर काही माणसाच्या कङनी ऊब घेत व्हती. पावसाने तर हद्दचं सोडली व्हती. सारखी चिरचीर चालू व्हती.पहाटचा गारवा सुटला होता. काहीकाहीजण पेपरवाल्याच्या आरोळ्या "ऐ पुण्यनगरी....ऐ पुण्यनगरी आवाजाने झोपल्या जाग्यावरचं पाय खोडून जागे व्हायलेले होते. तर काहीनी स्टॅण्ड बाहेर रहेना भाभीनी मांडलेल्या काळ्या कोळशाची मिसरी दातावर फिरवून खळाखळा चुळ भरून चहानं जीभ पोळवली.पुणे मुंबई वरून आलेल्या लक्झरी बसमधून पारुश्या माणसाचं लोंढच्या लोंढ बाहेर पडू लागलं.प्रवास व नोकरीच्या निमित्ताने अश्या अनेक रात्री स्टॅण्डवर जागून काढल्या आहेत.

             विशाल चिपङे 
             बावी आ.बार्शीवरून

No comments:

Post a Comment